शेतकऱ्यांच्या ओलिताचा हंगाम सुरू झाल्यानंतर अचानक महावितरणने शेतकऱ्यांची शेतीसाठी नियमित दिवसा सुरू असलेली वीज बंद केली व शेतकऱ्यांना गैरसोयीचे होईल अशा दोन वेळेत वीजपुरवठा सुरू केला होता. विविध पदाधिकाऱ्यांनी वीज मंडळात भेटी घेऊनही काहीच निष्पन्न झाले नाही. परंतु भीषणूर सर्कल मधील शेतकऱ्यांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर दुधाने यांच्याशी संपर्क केला व लागलीच त्यांनी शेतकऱ्यांसह महावितरण चे उपविभागीय कार्यालय गाठले. स्मार्ट मीटर लावल्यानंतर विजबिल दुपटीने येण्यासंबंधी व शेतकऱ्यांना दिवसा विजेसबंधी जाब विचारला असता अधिकाऱ्यांनी “सदर बाब आमच्या अखत्यारीत येत नाही” अशा पद्धतीने उत्तरे दिली. परंतु प्रश्न मार्गी न लागल्यास महावितरण कार्यालयात मुक्कामी थांबण्याचा इशारा सागर दुधाने यांनी शेतकऱ्यांच्या वतीने दिला. शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते हे लक्षात आल्यानंतर लगेचच “भारसिंगी सब स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व फीडरला सकाळी 8.45 ते 4.45 वाजेपर्यंत वीजपुरवठा उद्यापासून नियमित सुरू करू असे सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष सागर दुधाने यांच्यासह उपाध्यक्ष जितेंद्र लोने तसेच शेतकरी दिनकर फुले, जगदीश पोचट, शेषराव अंबाडे, वासुदेव कवडसे, प्रवीण शेंडे, शामराव झेलगोणदे, पुंडलीक मेशराम, योगराज मालापुरे, अनिल राऊत, गुणवंत तरटे, कृष्ण हेडाऊ व इतर शेतकरी उपस्थित होते.




