अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांत कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक रविवार, १२ एप्रिल रोजी भंडाऱ्यातील सन्नीज स्प्रिंगडेल स्कूलमध्ये अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत संघटन बळकटीकरण, युवा सहभाग आणि सामाजिक प्रबोधनावर भर देण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन विश्व मांगल्य सभेच्या राष्ट्रीय संपर्क प्रमुख तथा सन्नीज स्प्रिंगडेल स्कूलच्या कोषाध्यक्ष शुभांगी सुनील मेंढे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर विदर्भ प्रांताध्यक्ष डॉ. नारायण मेहरे, पश्चिम क्षेत्रिय संघटन मंत्री नितीन काकडे, उपाध्यक्ष श्रीपाद भट्टलवार, प्रांत संघटनमंत्री अभय खेडकर, प्रांत सचिव डॉ. चारुदत्त चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटिका शुभांगी मेंढे यांनी आपल्या मार्गदर्शनात ‘पंचपरिवर्तन’ संकल्पनेवर भर दिला. त्या म्हणाल्या, “आज मुले डॉक्टर-इंजिनिअर होत आहेत, पण कौटुंबिक संवादाचे काय? मातृभाषा, स्वदेशी वस्तूंचा वापर आणि कौटुंबिक प्रबोधन ही काळाची गरज आहे.” त्यांनी बुलेट ट्रेन आणि वंदे भारतचे उदाहरण देत ‘स्वदेशी’ जीवनशैलीचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.
प्रांताध्यक्ष डॉ. नारायण मेहरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संघटना हीच श्रेष्ठ असून कुणीही संघटने पेक्षा मोठा नाही असे सांगून “संपर्क आणि संवाद हा चिंतेचा नाही तर चिंतनाचा विषय आहे,” असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना आत्मपरीक्षणाचे आवाहन केले. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त (१२ जानेवारी) ‘समर्पण दिवस’ साजरा करणे, महिला व युवक संमेलने आयोजित करणे आणि नवीन कार्यकर्त्यांसाठी परिचय बैठका घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. दरम्यान घरगुती गॅस सिलेंडर, सोलर सिस्टम आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
या बैठकीत संघटनेच्या शिस्तीच्या दृष्टीने एक मोठा निर्णय घेण्यात आला. संघटनेतील नागपुरातील जुने पदाधिकारी गणेश शिरोळे, संजय धर्माधिकारी, अनिरुद्ध गुप्ते व प्रकाश भुजाडे यांनी संघटनेचे निर्देश धुडकावून नागपुरात समांतर कार्यकारिणी स्थापना करून संघटन विरोधी कारवाया केल्यामुळे संघटनेच्या बाहेर करण्याचा प्रस्ताव बहुमताने हात उंचावून पारित करण्यात आला.
प्रांत सचिव डॉ. चारुदत्त चौधरी यांनी मागील त्रैमासिक अहवालाचे वाचन केले. त्यानंतर नागपूर, अकोला, वर्धा, भंडारा, यवतमाळ, वाशिम आणि चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधींनी आपल्या कार्याचा अहवाल सादर केला.
बैठकीदरम्यान ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाची वार्ता समजताच संपूर्ण सभागृहाने दोन मिनिटे मौन पाळून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उद्घाटन समारंभाचे संचालन रवींद्र तायडे यांनी केले, तर आयटी सेल प्रमुख चंद्रशेखर साठे यांनी संघटनमंत्र सादर केला पर्यावरण प्रमुख संजय आयलवार यांनी महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या व शांतिमंत्राने या प्रेरणादायी बैठकीचा समारोप झाला. आभार प्रदर्शन डॉ. जयश्री सातोकार यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी भंडारा जिल्हाध्यक्ष जयंत सब्जीवाले यांच्यासह दीप्ती कुरोडे, कृष्णा खेडीकर, अनिल शेंडे, चंद्रशेखर साठे, संजय आयलवार, प्रकाश कुरोडे आणि रमेश पारधी यांनी विशेष प्रयत्न केले.




