गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील सोनोली (ना) शिवारात बिबट्याने गायीच्या पिल्लाची शिकार केल्याची घटना उघडकीस आली आहे. शेतकरी गणेश वसंतराव घोरमारे (वय ३५ वर्षे) यांची २ ते ३ वर्षांची गाय १३ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री त्यांच्या शेतातील इतर जनावराबरोबर गोठ्यात बांधलेली होती. त्यांनी जनावरे बांधून घरी परतल्यानंतर रात्री बिबट्याने या पिल्ल्यावर हल्ला केला.
दुसऱ्या दिवशी, म्हणजे १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७ वाजता, गणेश घोरमारे शेतात गेले असता गायीच्या पिल्लाचा शिवारात ठावठिकाणा लागत नव्हता. शिवारात शोध घेतल्यावर त्यांना समजले की पिल्ल्यावर बिबट्याने हल्ला करून त्याची शिकार केली आहे.
या घटनेची माहिती त्यांनी तात्काळ वनविभागाच्या आदासा बीटचे वनपाल के. एम. जामगडे यांना दिली. त्यानंतर वनपाल जामगडे आणि वनरक्षक राहुल हुलकाने यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
पंचनाम्यावेळी शिवारातील शेतकरी राजेंद्र घोरमारे, सुनील सोनबावणे, विनोद खोरखडे, मोरेश्वर आंबाडकर हे देखील उपस्थित होते.




