Home Breaking News सावनेर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी चढाओढ सुरू — नगर विकास आघाडीने केली भाजपाकडे नगराध्यक्ष...

सावनेर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी चढाओढ सुरू — नगर विकास आघाडीने केली भाजपाकडे नगराध्यक्ष पदासह पाच प्रभागांची मागणी

138
0

कृणाल सातपुते (सावनेर तालुका प्रतिनिधी)
सावनेर :
आगामी सावनेर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राजकीय चढाओढ तीव्र झाली आहे. सावनेर नगर विकास आघाडीच्या शिष्टमंडळाने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन नगराध्यक्ष पदासह पाच प्रभागांवर (क्रमांक १, २, ३, ५ आणि ८) उमेदवारी देण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.
गेल्या काही वर्षांपासून भाजपा व नगर विकास आघाडी युतीच्या माध्यमातून पालिकेत सत्ता राखत असून, या वेळीही काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी “आघाडी धर्म” पाळण्याची मागणी आघाडीकडून करण्यात आली आहे.
आघाडीचे नेते ॲड. अरविंद लोधी यांनी सादर केलेल्या प्रस्तावात, १९९७ पासून ते २०१७ पर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांतील युतीच्या परंपरेचा उल्लेख करत, आघाडीने नेहमीच भाजपाला पाठिंबा दिल्याचे नमूद केले आहे. २०१७ च्या पंचवार्षिक निवडणुकीत नगराध्यक्षपद अडीच-अडीच वर्षांसाठी विभागण्यात आले होते. त्यावेळी आघाडीने करार पाळत दीड वर्षानंतर नगराध्यक्षपद भाजपाला दिले होते.
परंतु नंतर काही भाजपा नगरसेवकांनी काँग्रेससोबत हातमिळवणी केल्याचा उल्लेखही या प्रस्तावात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, आगामी निवडणुकीत धर्मनिरपेक्ष मतदारांना एकत्र ठेवून काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्याच्या हेतूने नगराध्यक्ष पद व पाच प्रभागांवरील उमेदवारी आघाडीकडे देण्याची मागणी करण्यात आली आहे.
“भाजपाने आघाडी धर्म पाळून युती दृढ करावी,” अशी अपेक्षा नगर विकास आघाडीने व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here