गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर
पक्षातील जुने कार्यकर्ते हे ‘घर की मुर्गी दाल बराबर’ झाले आहेत. तुम्हाला बाहेरचा सावजीचा ‘चिकन मसाला’ चांगला लागतो, अशा उपरोधिक शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी पक्षातील ‘आयारामां’वर टीका केली.
कळमेश्वर येथील लेव्हल क्रॉसिंग क्रमांक २८९वरील रेल्वे उड्डाणपूल तसेच वन टाइम इम्प्रूव्हमेंट अंतर्गत अंतर्गत रस्त्यांच्या दुभाजकांसह सुधारणा प्रकल्पांचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अर्थ राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार डॉ. आशिष देशमुख, आमदार कृपाल तुमाने, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, ज्येष्ठ नेते डॉ. राजीव पोतदार आणि माजी आमदार अशोक मानकर यांची उपस्थिती होती.
गडकरी म्हणाले, “कळमेश्वर भागात डॉ. राजीव पोतदार सारखा प्रामाणिक कार्यकर्ता पक्षाला लाभला आहे. मी त्यांना नेहमी सांगायचो — दवाखान्याकडे लक्ष द्या, पण त्यांनी तो बाजूला ठेवून जनतेत राहून सतत सेवा केली. प्रामाणिकपणे जनतेची सेवा करणे हीच भाजपची खरी शिकवण आहे.”
गडकरी यांनी पुढे बोलताना विश्वास व्यक्त केला की, “येत्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे डॉ. राजीव पोतदार यांचे भविष्य अधिक उज्ज्वल करतील.”
गडकरी यांच्या या भाषणातून पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक मतदारांनी स्वतःच्या हक्काची बाजू ठामपणे मांडल्याचेही प्रतिबिंब दिसून आले. त्यांचे हे स्पष्ट आणि थेट विधान जनतेत व पक्षकार्यकर्त्यांमध्ये कौतुकास पात्र ठरले आहे.
या भाषणातून नितीन गडकरी यांनी जुन्या कार्यकर्त्यांविषयी आदर व्यक्त करताना नव्या राजकीय प्रवृत्तीवर उपरोधिक भाष्य केले असून, त्यांच्या या भूमिकेला स्थानिक स्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
Home Breaking News कळमेश्वर तालुक्यात भाजपच्या स्थितीवर गडकरींचा उपरोधिक टोला — जुने कार्यकर्ते ‘घर की...




