Home अपराध कळमेश्वरात गोधन तस्करीची भीषण दुर्घटना : ट्रक जळून २९ गाईंचा मृत्यू,तिघे तस्कर...

कळमेश्वरात गोधन तस्करीची भीषण दुर्घटना : ट्रक जळून २९ गाईंचा मृत्यू,तिघे तस्कर अटकेत

58
0

गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर पोलिस स्टेशन हद्दीत फेटरी परिसरात रविवारी पहाटे गोधन तस्करी करणारा ट्रक भीषण अपघातात जळून खाक झाला. या घटनेत २९ गाई होरपळून मृत्यूमुखी पडल्या, तर ८ गाई गंभीर जखमी झाल्या.
एमएच ४० सीडी ५०९४ क्रमांकाच्या ट्रकमधून कत्तलीसाठी ३७ गाई नागपूरकडे नेत होते. या गाईंना ट्रकमध्ये निर्दयपणे दोरखंडाने अतिशय घट्ट बांधण्यात आले होते. ट्रकचा टायर अचानक फुटला असताना चालकाने वाहन थांबवण्याऐवजी ते पुढे नेण्याचा प्रयत्न केला. फुटलेल्या टायरचा रस्त्याशी झालेल्या घर्षणामुळे ट्रकला अचानक आग लागली.
आग वाढताच चालक आणि त्याच्यासोबतचे तस्कर पळून गेले. स्थानिक गावकऱ्यांनी माणुसकी दाखवत आग विझवण्याचा प्रयत्न केला; परंतु आगीने क्षणातच रौद्ररूप धारण केले. तातडीने पोलिस आणि कळमेश्वर नगर परीषदेच्या अग्निशमन दलाला कळविण्यात आले. अग्निशमन दलाने मोठा प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
मात्र, आतमध्ये दोरखंडाने बांधलेल्या गाईंपैकी २९ गाईंचा मृत्यू, तर ८ गाई गंभीर जखमी झाल्या. जखमी जनावरांना राहुळगाव गोशाळेत दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृत गाईंचा खडगाव भागात अंत्यसंस्कार करण्यात आला.
या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे यांनी आपल्या टीम सोबत पोलिसांना महत्त्वपूर्ण मदत केली. घटनेनंतर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार व अपर पोलिस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनात फरार आरोपींचा पाठलाग करण्यात आला.
पोलिसांनी या प्रकरणी मोहम्मद नासीर मोहम्मद शफी, सैय्यद सुलतान हमीद अली, अमीर रहुप कुरेशी यांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार मनोज काळबांडे यांच्या मार्गदर्शनात बोरकर करीत आहेत.
या घटनेला गाईंची संघटित तस्करी व संघटित गुन्हेगारी मानून कडक कारवाईची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here