गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर शहरातून औद्योगिक वसाहतीकडे (एमआयडीसी) जाणाऱ्या मार्गावर असलेल्या रेल्वे गेटवरील वाढत्या वाहतूक कोंडी व नागरिकांच्या तक्रारींचा सकारात्मक निकाल लागला आहे. या रेल्वे गेटवर उड्डाणपूल उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे,अशी माहिती आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी दिली.
या संदर्भात आज नागपूर येथील रेल्वे विभागीय आयुक्तांशी आमदार डॉ. देशमुख यांनी बैठक घेतली. या बैठकीत कळमेश्वर रेल्वे गेटमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीचे आणि नागरिकांच्या अडचणींचे सविस्तर विवेचन करण्यात आले.दररोज हजारो कामगार, विद्यार्थी, रुग्णवाहिका आणि सर्वसामान्य नागरिकांना या गेटमुळे अनेक तास वाहतुकीत अडकावे लागत होते. कामावर उशिरा पोहोचणाऱ्या कामगारांवर शिस्तभंगाची कारवाई होत होती, तर रुग्णवाहिकांमध्ये गंभीर रुग्ण असतानाही वेळेवर उपचार मिळवणे कठीण जात होते. यामुळे शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक मोठे प्रश्न निर्माण झाले होते.या ठिकाणी उड्डाणपूल मागणीकरीता काही दिवसापूर्वी शिवसेना शिंदे गटाचे कळमेश्वर तालुका प्रमुख ब्रिजलाल रघुवंशी नी आंदोलन सुद्धा केले होते.
या सर्व गोष्टींचा सखोल आढावा घेऊन, आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी प्रभावीपणे रेल्वे प्रशासनासमोर मागणी मांडली आणि अखेर उड्डाणपूल मंजूर करून घेतला.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबणार, रुग्णवाहिकांचा मार्ग मोकळा होणार,कामगार वेळेवर पोहोचू शकणार, वाहतुकीची सुसूत्रता वाढणार असून संपूर्ण परिसराला दिलासा मिळणार आहे.
या सकारात्मक निर्णयाबद्दल कळमेश्वर व परिसरातील नागरिकांनी आमदार डॉ.आशिषराव देशमुख व शिवसेना शिंदे गटाचे कळमेश्वर तालुका प्रमुख ब्रिजलाल रघुवंशी यांचे आभार मानले असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.




