सावनेर येथील महात्मा गांधी चौक येथे (दि.१९) रोजी तालुक्यातील ‘किसानपुत्र आंदोलन’ या चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन आजवर आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱ्यांप्रती सहवेदना व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली.
सरकारच्या धोरणांना कंटाळून त्याचा निषेध म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हान येथील सुविद्य शेतकरी साहेबराव करपे यांनी १९ मार्च १९८६ रोजी सहकुटुंब आत्महत्या केली होती. सरकार दरबारी नोंद झालेली ही पहिली शेतकरी आत्महत्या ठरली. त्यामुळे या दिवशी संपूर्ण राज्य, देश व विदेशात असणारे किसानपुत्र कार्यकर्ते जेष्ठ पत्रकार व विचारवंत अमर हबीब प्रणित ‘किसानपुत्र आंदोलन’ या चळवळीच्या वतीने हा दिवस ‘शेतकरी सहवेदना दिन’ म्हणून पाळत एक दिवस उपवास करून अन्नत्याग आंदोलन करतात. याचाच भाग म्हणून सावनेर तालुक्यातील किसानपुत्र कार्यकर्त्यांनी असेल तिथे राहून अन्नत्याग आंदोलन केले. तसेच काही कार्यकर्त्यांनी सावनेर येथील जेष्ठ सामाजिक व राजकीय विचारवंत सेवकराम राऊत यांच्या नेतृत्वात त्यांच्या घरी एकत्रित येत श्रद्धांजली सभा घेतली. शेतकरी विरोधी कायदेच कसे शेतकऱ्यांच्या गळ्यातील फास ठरत आहेत,यावर चर्चासत्र पार पडले.दिवसभर चाललेल्या सभेचा व अन्नत्याग आंदोलनाचा समारोप सायंकाळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला.किसानपुत्र सेवकराम राऊत,गजानन कुरवाडे, दीपक नारे,मनिष अडागळे,प्रमोद सोनुले,नरेंद्र पाटील, कांचन ढवंगाळे, निलेश ढवंगाळे आदी उपस्थित होते.
Home कृषी सावनेर येथे किसानपुत्रांची सहवेदना सभा आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱ्यांना वाहिली श्रद्धांजली