आज १० मे ! स्वर्गीय बिंदुमाधव जोशी यांची दहावी पूण्यतिथी ! ग्राहक चळवळीत काम करण्याऱ्या कार्यकर्त्यांना त्यांचे स्मरण सदैव असते, नव्हे त्यांच्या आठवणी शिवाय ग्राहक पंचायतीचे कामच पूढे जात नाही असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. आज पूण्यतिथीच्या निमीत्ताने मात्र स्व. नानांचे (स्व.बिंदुमाधव जोशी यांना कार्यकर्ते नाना याच नावाने संबोधित असत) विशेष आणि तीव्र स्मरण होणे स्वाभाविक आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संघटन मंत्री तथा रा.स्व.संघाचे माजी सहसरकार्यवाह स्व. मदनदासजी देवी यांनी एका लेखात ‘बिनचेहऱ्याच्या चळवळीला चेहरा देणारा समाजशिल्पी स्वयंसेवक’ असा स्व. बिंदुमाधव जोशी यांचा उल्लेख केला होता. एका अर्थाने मदनदासजींनी स्व. नानांचे केलेले वर्णन एकदम बरोबर वाटते कारण संपूर्ण समाजच ग्राहक आहे. एका वस्तुचा उत्पादक किंवा व्यापारी हा अन्य ठिकाणी ग्राहकच असतो. अशा वेळी संपूर्ण ग्राहकांच्या शोषणमुक्तीसाठी कोण पुढे येणार ? असे असले तरी स्व. नानांनी मात्र समन्वयवादी विचाराचा मूलमंत्र देवून ग्राहक चळवळीत तो चांगलाच रुजवला. ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांच्या मनावर तो प्रभावीपणे बिंबवला. त्यामुळे आज २१ व्या शतकात जिथे परस्परांचे हितसंबंध टोकाचे असतांना ग्राहक पंचायतीचा कोणताही खरा कार्यकर्ता ज्यामुळे समाज दुभंगला जाईल, अशी विघातक भूमिका कधीही घेत नाही.
१९७४ मध्ये स्व. बिंदुमाधव जोशी यांनी ग्राहक पंचायतीची स्थापना केली. देशभरातील आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेवून ग्राहक चळवळ केवळ उभीच केली नाही तर तिचा प्रभावही निर्माण केला. त्यासाठी चिंतन केले, विचार मांडला आणि आज तो सर्वमान्य विचार आहे. सर्वच क्षेत्रात होणारी ग्राहकांची लुट बघून ग्राहक चळवळ नावाची संकल्पना स्वतंत्र भारतात अस्तित्वात येण्याची आवश्यकता असल्याच्या जाणीवेणेच त्यांनी अ.भा. ग्राहक पंयाचतीची स्थापना केली. बिन चेहऱ्याच्या चळवळीला नवा चेहरा दिला, भारतीय तत्त्वज्ञानाची एक पक्की बैठक दिली, कोणत्याही प्रश्नांकडे सकारात्मकपणे पाहण्याची दृष्टी दिली. आपले प्रश्न आपणच सोडविले पाहिजे अशी हिंमत स्व. नानांनी दिली आणि कोणतीही सामाजिक चळवळ कशी चालवावी याचा नवा मार्ग ग्राहक पंचायतीच्या रुपाने देशाला दिला.
शोषणमुक्त कल्याणकारी अर्थव्यवस्था आणि ग्राहकाभिमुख प्रशासन हे दोन उद्देश समोर ठेवून ते साध्य करण्यासाठी ग्राहक पंचायत स्थापनेचा खटाटोप स्व. बिंदुमाधव जोशीयांनी केला. प्रशासन जर ग्राहकाभिमुख व्हावयाचे असेल तर त्याला कायद्याचा आधार पाहिजे म्हणूनच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने १९८६ चा ग्राहक संरक्षण कायदा तयार केला. या कायद्याअंतर्गत ग्राहक पंचायतीचा समन्वयवादी विचार गृहीत धरुनच जास्तीत जास्त तरतुदी करण्यात आल्या आहेत. ग्राहक न्यायालय ही तक्रार निवारणाची सर्वात शेवटची पायरी ठेवण्यात आली आहे. हा कायदा तयार करतांनासुध्दा कधी नव्हे एवढा समन्वय घडवून आणून सर्वसंमतीने कायदा पारित करण्यात स्व. बिंदुमाधव जोशी यशस्वी झाले. सरकार कॉग्रेसचे, पंतप्रधान राजीव गांधी आणि नाना संघ स्वयंसेवक तरीही कायद्याला कुणाचाही विरोध नव्हता. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्व जिल्ह्यात ग्राहक न्यायमंचाची निर्मिती करण्यासाठी शासनस्तरावर स्व. नानांनी केलेली प्रचंड धडपड ही ऐतिहासिकच म्हणावी लागेल. त्याचाच परिणाम म्हणुन केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशभरात ग्राहक न्यायालयाचे काम चांगल्या प्रकारे सुरु असुन ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीप्रमाणेच जिल्हा स्तरावर प्रशासन व ग्राहक चळवळीतील कार्यकर्त्यांच्या समन्वयातुन ग्राहक संरक्षण परिषदांच्या माध्यमातून ग्राहकांचे विविध प्रश्न सोडविण्याचा यशस्वी प्रयोग होत आहे.
स्व. बिंदुमाधव जोशी नेहमीच म्हणायचे की ‘नवे शतक हे ग्राहक शतक’ म्हणुन पुढे आले आहे. ग्राहक युगाची पहाट आता झाली आहे पण लक्षात ठेवा, केवळ ‘ग्राहक’ म्हणुन उदो उदो करीत राहून अर्थव्यवस्थेमधील बाकी सर्व घटकांना आपण तुच्छ ठरवू लागलो तर ते एकांगी होईल. केवळ ग्रहकांची आरती करुन भागणार नाही. ग्राहक चळवळ ही भारत मातेची तळी आरती आहे. तळी आरती मध्ये ‘येळकोट’ म्हणून सर्वांनी हात लावून तळी उचलायची असते. भारताच्या समृध्दीची तळी आरती उचलण्यासाठी कारखानदार, उद्योजक, कर्मचारी, व्यापारी, शेतकरी ग्राहक या सर्वांनी हातभार लावला पाहिजे. समृध्दीचा ‘येळकोट’ करुन एकाच वेळी आपण सर्वांनी ही तळी उचलली तर ऐश्वर्यसंपन्न भारत फारसा लांब नाही यालाच समन्वयवादी मुल्याधिष्ठीत अर्थशास्त्र म्हणतो.’ भारताला आज त्याची आवश्यकता आहे. आजही ग्राहक पंचायतीची चळवळ या कार्यासाठी वचनबध्द आहे.
स्व. बिंदुमाधव जोशी हे केवळ विचारवंतच नव्हते तर पूरूषार्थी कर्मयोगी होते. संघ प्रचारक म्हणून त्यांचे काम उल्लेखनिय आहे. संघाच्या मुशीत तयार झालेल्या दिड – दोनशे स्वयंसेवकांबरोबर दीव-दमण, दादरा नगर हवेली यांना पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी सशस्त्र हल्ला केला, मुक्तीही मिळविली तिरंगा फडकवला. या स्वातंत्र्य लढ्यातील स्वयंसेवकांना स्वातंत्र्य सेवकाचे प्रशस्तीपत्रही मिळवून दिले. स्व. नानांनीच सावरकर प्रतिष्ठानच्यामाध्यमातून वीर सावरकर चित्रपट हाती घेतला. श्री. सुधीर फडके व अन्य सहकाऱ्यांनी कष्टाने निधी गोळा करून सावरकर चित्रपट काढला आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जीवन नव्या पिढीसमोर आणले. स्व. नाना लोकसंग्रह, लोक जागरण व लोकहितासाठीच जगले.
स्वयंसिध्द ग्राहक चळवळीसाठी अभ्यासु, निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी उभारणे, अडचणीच्या काळात कार्यकर्त्यांना सर्व प्रकारे सहाय्य करुन त्यांना वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करुन देणे हेही स्व. बिंदुमाधव जोशी यांचे वैशिष्ट्य होते. जनसंघासारख्या राजकीय पक्षातही त्यांनी काही काळ काम केले. परंतु राजकारण हे संधीसाधू निसरडे आणि आपल्या समाजशरण वृत्तीला मेळ खाणारे नाही हे लक्षात येताच ते स्वतःहून राजकारणापासून दूर झाले आणि राष्ट्रीय स्तरावरील आंदोलन उभारून ‘ग्राहक’ या शब्दाला समाजातच नव्हे तर शासनदरबारी सुध्दा त्यांनी विलक्षण वजन मिळवून दिले. भारतीय ग्राहकांचे हक्क व अधिकार यांचे योग्य भान ठेवून ग्राहक चळवळ ही पाश्चात्य (consumerism) उपभोक्तावादापेक्षा पूर्ण वेगळी ठेवण्यात ते यशस्वी झाले. खरे म्हणजे स्व. नानांविषयी कितीही लिहीले तरी ते तोकडेच आहे. एका शब्दात वर्णन करायचे तर ते ‘एक परिपूर्ण संघसेवक’ होते असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही असे वाटते.
आज ग्राहक पंचायतीला ५० वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. नुसताच अ.भा. ग्राहक पंचायतीने आपले स्वर्णमहोत्सवी वर्षही साजरे केले. स्व. बिदुमाधव जोशी यांनी घालुन दिलेल्या आदर्शाना पुढे ठेवन अ.भा. ग्राहक पंचायतीच्याच नव्हे तर ग्राहक चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपली वाटचाल सुरु ठेवून ग्राहकहिताची दमदार पावले उचलणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
दिनांक : १० मे २०२५
डॉ. नारायण गो. मेहरे
अध्यक्ष
अ.भा. ग्राहक पंचायत विदर्भ प्रांत मो. ७०३८३५८४६६




