गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
आज पंचायत समिती कार्यालय कळमेश्वर येथे कृषी विभाग खरीप हंगामपूर्व नियोजन सभा पार पडली.यात सावनेर व कळमेश्वर तालुका कृषी अधिकारी यांनी दोन्ही तालुक्याचा आढावा देण्यात आला. यावेळी आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी शेतकऱ्यांविषयी अनेक प्रश्न अधिकाऱ्यांना विचारले. कापूस, तूर, सोयाबीन मुख्य पीक असून यावर्षी कपाशीचे क्षेत्र वाढणार असून सोयाबीनचे क्षेत्र कमी होणार असल्याचे सांगितले.
या वेळी आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी बोलताना शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली. शेतकऱ्यांच्या जीवनात नवीन बदल घडावा, यासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना द्यावी. शेतकऱ्यांना पेरणीसाठी उच्च गुणवत्ता असलेले बियाणे मिळावे, बोगस बियाणे पकडण्यासाठी भरारी पथक नेमून त्यांच्यावर कारवाई करावी, असे सांगितले. जिल्हा सहकारी बँक आपण कार्यरत केलेली आहे, पीक कर्ज जास्तीतजास्त लोकांना वाटप करावे, ते करत असताना कोणत्याही अधिकाऱ्यांनी विविध कारणे दाखवू नये व कोणत्याही शेतकऱ्यांला पीककर्ज पासून अलिप्त ठेवू नये, अन्यथा आपण आक्रमक पवित्रा घेऊ. गडकरी साहेबांच्या संकल्पतेतुन मदर डेअरी आपल्याला दिसते. पण सावनेर, कळमेश्वरमध्ये कुठेही दिसत नाही. तरी आपल्याला जोडधंद्यासाठी मदर डेअरी उघडायच्या आहेत. तरी तसे प्रस्ताव पाठवा असे सुचविले. जलयुक्त शिवार या योजनेला कृषी विभागशी जोडून पाण्याची पातळी वाढवावी. भाजीपाला, फुलशेती, कोबी, अशा नवीन पीकपद्धती अवलंबाव्या, सर्व अधिकाऱ्यांनी पारदर्शकतेने मेहनतीने काम करावे, यावेळी कोणत्याही कर्मचाऱ्याने कामात कुचराही करू नये. ज्या प्रकारे पंचायतराज विभागामध्ये कळमेश्वर तालुक्याचा प्रथम क्रमांक आला आहे, त्याप्रमाणे कृषी विभागामध्ये यावर्षी माझ्या सावनेर किंवा कळमेश्वर या तालुक्याचा प्रथम क्रमांक यावा.
या वेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य राजीव पोतदार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे, प्रमोद हत्ती, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, गटविकास अधिकारी अंशुजा गराटे, तालुका कृषी अधिकारी सावनेर सोमनाथ साठे,तालुका कृषी अधिकारी कळमेश्वर जुमडे व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.




