गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
आज सोमवार दिनांक 16 जूनला जिल्हा नियोजन भवन, नागपूर येथे नगर परिषद मोहपा येथील चुकीचा झालेल्या सिटी सर्वेबाबत महसूल मंत्री व पालकमंत्री ना श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी सावनेर चे आमदार डॉ आशिषराव देशमुख यांच्या सतत पाठपुराव्यामुळे तात्काळ बैठक लावली होती. मोहपा नगर परिषदेचा सिटी सर्वे सन 2017-18 मध्ये तालुका भूमीअभिलेख कार्यालय कळमेश्वर यांच्याद्वारे झाला होता आणि तो 99 टक्के चुकीचा झाला होता. त्यामुळे मोहपा शहरातील बहुतांश संपूर्ण नागरिकांना अनेक समस्यांना समोरे जावे लागत आहे.
या महत्त्वाच्या विषयासाठी आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी शासनदरबारी पाठपुरावा केला. त्यांनी पत्राद्वारे मोहपा शहरातील ज्या अनेक समस्या जसे की, वडिलोपार्जित असलेल्या जमीनीलासुद्धा खरेदी-विक्रीसाठी अडचण होत आहे, यामुळे संपूर्ण शहराला खूप त्रास होत आहे. हे सर्व मुद्दे आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी शासनाकडे धरून लावले. त्याची दखल घेत आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी जिल्हा नियोजन भवन नागपूर येथे झालेल्या बैठकीमध्ये जुना संपूर्ण सिटी सर्वे रद्द करून नवीन सिटी सर्वे करावा, असा आदेश दिला. मुख्य म्हणजे, यासाठी लागणारा संपूर्ण खर्च डीपीडीसी मधून होणार आहे. महत्वाचे म्हणजे सर्व लाभार्थ्यांना मोफत सनद वाटप करण्यात येणार असून यामध्ये लाभार्थ्यांना कोणताही खर्च करण्याची गरज पडणार नाही. ही सर्व कार्यवाही 3 दिवसांमध्ये पूर्ण करावी, असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना बावनकुळे साहेबांनी दिले.
विशेष म्हणजे,आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी महसूल मंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांना यासंबंधी 02 जूनला सुद्धा एक निवेदन दिले होते. सतत पाठपुरावा केल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.




