छत्रापुर गावाजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. भरधाव वेगाने आलेल्या एका मोठ्या कंटेनरने रस्त्यावर असलेल्या २५ जनावरांना उडवले. या भीषण अपघातात अनेक जनावरे जागीच मृत्युमुखी पडली.
या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. कारण, ही पहिली वेळ नव्हे. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत, मात्र प्रशासनाकडून ना भरपाई देण्यात आली, ना कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्यात आली. या निष्क्रियते विरोधात छत्रापुर ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या देत तीव्र आंदोलन सुरू केलं.
या आंदोलनाची माहिती मिळताच आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधत त्यांच्या व्यथा समजून घेतल्या. घटनास्थळीच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून, गावकऱ्यांची दीर्घकालीन मागणी असलेला उड्डाणपूल लवकरात लवकर मंजूर करून देण्यात यावा, अशी मागणी केली. या विषयावर भाष्य करताना, संबंधित अधिकऱ्यांनी तात्काळ या मागणीची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असा शब्द दिला.
“हा पूल पूर्ण झाल्यावर अशा हृदयद्रावक घटना पुन्हा घडणार नाहीत,” असा विश्वास त्यांनी ग्रामस्थांना दिला. त्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवत आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
“ही लढाई केवळ आजच्या आंदोलनापुरती नाही, तर छत्रापुरवासीयांच्या सुरक्षित भविष्यासाठी आहे — आणि ती मी शेवटपर्यंत लढणार,” असा ठाम निर्धार आमदार आशिषराव देशमुख यांनी व्यक्त केला.
Home Breaking News छत्रापुर (नांदागोमुख फाटा )जवळ महामार्गावर भीषण अपघात – २५ जनावरांचा मृत्यू, गावकऱ्यांचे...




