गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर तालुक्यातील भाजपच्या राजकारणात सध्या तापमान चांगलेच वाढले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपरोधिक वक्तव्याने पक्षातील अंतर्गत हालचालींना वेग आला आहे.
“घरची मुर्गी दाल बराबर, बाहेरचा सावजीचा चिकन मसाला चांगला लागतो” — या एका वाक्याने गडकरींनी पक्षातील ‘आयाराम-गयाराम’ संस्कृतीवर झणझणीत टीका केली. हे वक्तव्य त्यांनी कळमेश्वर रेल्वे उड्डाणपूल व अंतर्गत रस्ते सुधारणा प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यात केले. मात्र, भाषणातील हा सूचक इशारा थेट तालुक्यातील संघटनात्मक परिस्थितीकडे निर्देश करणारा असल्याचे बोलले जात आहे.
भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांवर होणारे दुर्लक्ष आणि नव्याने पक्षात प्रवेश करणाऱ्यांना दिला जाणारा विशेष सन्मान — या मुद्द्यांवर कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
या पार्श्वभूमीवर तालुका अध्यक्ष प्रमोद हत्ती यांच्या नेतृत्वाची खरी कसोटी लागणार आहे. संघटना सशक्त ठेवून आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपचा झेंडा पुन्हा फडकविण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर उभे आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, गडकरींचा हा ‘सूचक संदेश’ म्हणजे फक्त टीका नव्हे, तर पक्षातील संघटनात्मक बळकटीसाठी केलेला जागे करण्याचा प्रयत्न आहे. आता पाहायचे एवढेच — प्रमोद हत्ती गडकरींच्या या इशाऱ्याला कृतीत उतरवतात का, आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यात कितपत यशस्वी ठरतात.
अशी कळमेश्वर तालुक्यातील गावागावात मतदारांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
Home Breaking News गडकरींच्या टोलेबाज वक्तव्याने कळमेश्वरच्या राजकारणात खळबळ — तालुका अध्यक्ष प्रमोद हत्तींची खरी...




