गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर
कळमेश्वर-ब्राह्मणी नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी रंगत आली असून, यंदाच्या निवडणुकीत २१ नगरसेवकांसह एका नगराध्यक्षपदासाठी २९ हजार ८५५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात १४ हजार ९५० पुरुष तर १४ हजार ९०५ महिला मतदारांचा समावेश आहे. मतदारांच्या सोयीसाठी एकूण ३३ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विकास बिक्कड आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व मुख्याधिकारी आकाश सुरडकर यांनी नागरिकांना लोकशाही प्रक्रियेला बळ देण्यासाठी उत्साहाने मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कळमेश्वर तहसील कार्यालयातून पार पडणार असून, नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत १० ते १७ नोव्हेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत राहणार आहे. १८ नोव्हेंबरला अर्ज छाननी, २६ नोव्हेंबरला चिन्हवाटप, तर ३० नोव्हेंबर रोजी प्रचाराची सांगता होईल. २ डिसेंबरला मतदान होणार असून, ३ डिसेंबरला मतमोजणी तहसील कार्यालयात केली जाईल.
निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एसएसटी व एफएसटीची चार पथके तयार करण्यात आली आहेत. प्रशासन पूर्णपणे सज्ज असून, दुबार मतदारांकडून दुबार मतदान होऊ नये म्हणून हमीपत्र घेण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार विकास बिक्कड यांनी दिली.




