Home सांस्कृतिक व सामाजिक परमात्मा एकच्या जयघोषाने दुमदूमली चिरव्हा नगरी-भव्य सेवक संमेलन व शोभायात्रेचा जल्लोष!

परमात्मा एकच्या जयघोषाने दुमदूमली चिरव्हा नगरी-भव्य सेवक संमेलन व शोभायात्रेचा जल्लोष!

42
0

मौदा तालुका प्रतिनिधी)
चिरव्हा येथे “मानव हा निमित्त मात्र आहे, सर्वेसर्वा भगवंत आहे” या दिव्य संदेशाच्या गगनभेदी जयघोषाने चिरव्हा गाव दुमदूमून गेले. २५ डिसेंबर रोजी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाच्या वतीने आयोजित भव्य सेवक संमेलन व आकर्षक शोभायात्रेने हजारो भक्तांच्या मनात आध्यात्मिक उत्साहाची लाट उसळली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र गायधने होते, तर उद्घाटक तापेश्वर वैद्य यांनी उपस्थितीने सोहळ्याला चार चांद लावले. भगवान बाबा हनुमानजींच्या प्रतिमेचे पूजन व महान त्यागी बाबा जुमदेवजी तसेच मातोश्री वाराणसी आई यांचे हार्दिक स्वागताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सकाळी मार्गदर्शकांच्या निवासस्थानी पवित्र हवनानंतर विविध जिल्ह्यांतील सेवकांनी सादर केलेल्या रंगबिरंगी झाकी, जोशपूर्ण नृत्य व ढोलताशांच्या ठेका ठेक्यात भव्य शोभायात्रा निघाली, ज्याने संपूर्ण गावाला भक्तिमय वातावरणात न्हाऊन टाकले.
अध्यक्ष रवींद्र गायधने यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन करताना म्हटले, सेवकांनी सत्य, मर्यादा व प्रेमाने जीवन जगावे. कर्मप्रधान मार्ग अवलंबून आई-वडिलांची सेवा करावी, आत्म्याला दुःख देऊ नये. बाबांनी दिलेले चार तत्त्वे, तीन शब्द व पाच नियम पाळल्यास जीवन सुख-शांतीने समृद्ध होईल. दुःख हे कर्मानुसार येते, त्यासाठी मार्गदर्शकांचे मार्गदर्शन घ्यावे, असे त्यांनी भावपूर्ण शब्दांत सांगितले.
उपाध्यक्ष देवराम तुमसरे, सचिव किरण राऊत, कोषाध्यक्ष सुभाष दहेकर यांच्यासह संचालक, माजी पदाधिकारी व शेकडो मार्गदर्शक-कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन शांताराम गावंडे, प्रस्तावना सुधाकर वंजारी तर आभार धनराज मीरासे यांनी मानले.
शोभायात्रेतील झाकींनी बाबांच्या जीवनचरित्राचे मार्मिक दर्शन घडवले – वेळेचे महत्त्व, शैतानी घर, त्रिताल हवन असे विविध विषय सादर झाले. प्रथम पारितोषिक मांगली (तेली), द्वितीय मौदा व तृतीय मारोडी झाकीला मिळाले, तर इतर झाकींचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
सर्व सेवकांनी महाप्रसादाचा आनंद घेतला. सायंकाळी भजनांच्या सुमधुर स्वरांनी व नाटकाच्या कार्यक्रमाने संमेलनाची आध्यात्मिक सांगता झाली. हजारो भक्तांच्या उत्साहाने हा सोहळा अविस्मरणीय ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here