मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे मुसळधार पावसामुळे शेती आणि नागरी भागात झालेल्या नुकसानासंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण निर्देश दिले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कापणी झालेल्या पिकांवरील परिणामाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचा विचार करण्यात येईल.
यासोबतच, खरीप 2025 आणि यानंतरच्या कालावधीतील शेतीच्या नुकसानभरपाईसाठी 27 मार्च 2023 च्या शासन निर्णयातील दर आणि निकष लागू राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले. मासळी सुकवण्याच्या प्रक्रियेत झालेल्या नुकसानाबाबत मच्छिमारांना मदतीसाठी प्रस्ताव सादर करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
रस्ते व पूल यांवर झालेल्या परिणामांची दखल घेत ग्रामविकास व सार्वजनिक बांधकाम विभागांना तत्काळ उपाययोजना करण्याचे सुचवले गेले. विशेषतः रेड अलर्ट घोषित करण्यात आलेल्या भागात प्राथमिकतेने दुरुस्तीचे काम हाती घेण्याचे आदेशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समक्ष यावेळी मदत आणि पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव यांनी सादरीकरणाद्वारे राज्यभरातील नुकसानाची माहिती दिली. याअंतर्गत घरांची पडझड व दुरुस्ती यासाठी राज्यभरातील विविध विभागांना ₹49 कोटींचा निधी वितरित करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील पाणी टंचाईच्या परिस्थितीमध्ये सुधारणा झाली असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत टँकरने पुरवठा करण्यात येत असलेल्या गावांच्या संख्येत 200 इतकी तर टँकरच्या संख्येत 336 इतकी घट झाली असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.
यावेळी मंत्री गणेश नाईक, मंत्री नितेश राणे व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.




