गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
पोलीस स्टेशन रामटेक हद्दीतील नगरधन येथील रहीवाशी तथा व्हाईस ऑफ मिडीया संघटनेच्या रामटेक शाखेचे सदस्य सुरेंद्र बालचंद बिरणवार यांना गैरअर्जदाराकडून तुम्ही 3 ऑगस्ट 2025 रोजी वर्तमानपत्रात बातमी का बरं छापली व त्यामुळे आमची बदनामी झाली म्हणून गैरअर्जदाराकडून वारंवार जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. याबाबद पत्रकार बिरणवार यांनी रितसर रामटेक पोलीस स्टेशनला १० ऑगस्ट २०२५ रोजी तक्रार दिली मात्र रामटेक पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न केल्यामुळे संतापुन जाऊन व्हाईस ऑफ मिडिया पत्रकार संघटनेच्या सदस्यांनी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप घोरमारे यांचे नेतृत्वात आज दि. १२ ऑगस्ट ला आपल्या सक्तीच्या कार्यप्रणालीमुळे चर्चीत असलेले नागपुर ग्रामीण चे पोलीस अधिक्षक हर्ष पोतदार यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली असता त्यांनी ‘ घटनेची चौकशी करा व सत्यता आढळल्यास ॲक्शन घ्या ‘ असे लेखी आदेश दिल्याने आता स्थानीक पोलीस प्रशाषणाचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
उल्लेखनीय म्हणजे हा अतिशय गंभीर प्रकारचा गुन्हा असुन यामुळे पत्रकारांच्या लेखणी स्वातंत्र्यावर बंधन आणणारा प्रकार आहे. पत्रकार बिरणवार यांनी रामटेक पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिल्यावर एन.सी. मॅटर ची नोंद करून पत्रकारांच्याच तोंडाला पाणे पुसल्याचा प्रकार रामटेक पोलीसांकडुन झालेला असल्याचे दिसुन येत आहे. पत्रकार संरक्षण कायदा अस्तीत्वात असतांना व येथे रामटेक पोलीस स्टेशन असतांना येथे न्याय न मिळाल्यामुळे जर पत्रकारांना नागपुर येथे पोलीस अधिक्षकांकडे न्यायासाठी जावे लागत असेल तर याहून मोठी शोकांतीका कोणती असे एस.पी. पोतदार यांना चर्चेअंती पत्रकारांनी म्हटले. अजूनपर्यंत गुन्हेगारांना अटक करण्यात आलेली नाही तसेच पत्रकार संरक्षण कायदा २०१९ चे कलम ३ नुसार कोणत्याही गंभीर गुन्हाची नोंद केली नाही. भविष्यात पत्रकारांबाबद अशा प्रकारचे कृत्य कोणी करणार नाही अशी कारवाई केली गेली पाहिजे अशी पत्रकारांची रास्त मागणी आहे.
पोलीस प्रशासणाच्या हालचालींना वेग
आज दि. १२ ऑगस्ट ला जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पत्रकारांनी आपल्या एकजुटतेचे उदाहरण देत मोठ्या संख्येने पोलीस अधिक्षक कार्यालय गाठले. येथे सुरुवातीला अपर पोलिस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्यापुढे विषय मांडला असता त्यांनी विषय गांभीर्याने घेत ‘ प्रकरणाची त्वरित चौकशी करून संबंधितांना आदेश देतो ‘ असे सांगितले. तसेच पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार यांनी रामटेक ठाणेदारांना प्रकरणाची चौकशी करून सत्यता आढळल्यास ॲक्शन घ्या असे लेखी स्वरूपात सांगितले. दरम्यान याचवेळी येथे रामटेक चे उपविभागीय पोलीस अधिकारी बरकते हे एस.पी. साहेबांच्या मीटिंगसाठी आले होते यावेळी रामटेकचे पत्रकार येथे तक्रार घेऊन आले असल्याचे त्यांना कळले असता त्यांनी त्वरित आपल्या भ्रमणध्वनीद्वारे संबंधितांना कारवाई करण्याचे आदेश दिले.




