गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
आमदार डॉ आशिष देशमुख यांच्या वतीने सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांसाठी लता मंगेशकर हॉस्पिटल व माझी माऊली फाउंडेशन मिशन हेल्थ अंतर्गत नि:शुल्क आरोग्यवाहिनी (बस) सेवा तसेच सवलतीच्या दरात उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेचा भव्य शुभारंभ या क्षेत्राचे लोकप्रिय आमदार डॉ आशिष देशमुख यांच्या शुभहस्ते दि. 04 सप्टेंबर 2025 ला गांधी चौक, सावनेर येथे करण्यात आला.
या आरोग्य सेवेसंबंधी योजनेअंतर्गत सावनेर व कळमेश्वर तालुक्यातील विविध गावांमधून ठराविक मार्गांवरून दररोज नि:शुल्क आरोग्यवाहिनी (बस) सेवा सुरू करण्यात आली आहे. रुग्णांना घेऊन ही बस लता मंगेशकर हॉस्पिटल, हिंगणा रोड, नागपूर येथे पोहोचेल. तेथे वैद्यकीय उपचार झाल्यावर त्यांना परत त्यांच्या गावी पोहोचवेल.
या नि:शुल्क आरोग्यवाहिनी (बस) सेवा व वैद्यकीय उपचार सेवेच्या शुभारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात आमदार डॉ आशिष देशमुख म्हणाले की, सावनेर-कळमेश्वर मतदारसंघातील रुग्णांना अत्याधुनिक सुविधांनी युक्त उपचार सेवा प्रदान करून त्यांचे आरोग्य उत्तम राहावे, हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. त्या अनुषंगाने, शासकीय योजनांच्या अंतर्गत नि:शुल्क उपचार सेवा तसेच शासकीय योजनेत न बसणाऱ्या रुग्णांना 50% सवलतीच्या दरात सर्व प्रकारच्या उपचार सेवा प्रदान केल्या जातील. बाह्यरुग्ण व आंतररुग्ण सेवेचा लाभ या निमित्ताने या क्षेत्रातील रुग्णांना मिळेल. या क्षेत्रातील नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी मी सदैव तत्पर असेन. विविध मार्गांवरून सुरू करण्यात आलेल्या निःशुल्क आरोग्यवाहिनी (बस) सेवेचा रुग्णांनी लाभ घ्यावा. दुर्गम भागातील आर्थिकदृष्ट्या कमजोर रुग्ण चांगल्या उपचार सेवेपासून वंचित राहू नये, म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे.
ते पुढे म्हणाले, आरोग्य व शिक्षण यावर विशेष भर देऊन ‘सावनेर नवनिर्माण’ या संकल्पद्वारे विकास घडवून आणू, सर्व अवैध धंद्यांवर आळा घालू तसेच रोजगाराच्या माध्यमातून बेरोजगारीवर मात करू. सावनेर विधानसभा क्षेत्र विदर्भ, महाराष्ट्रातच नव्हे तर देशात एक नंबर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करु.
माझी माऊली फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ आयुश्री देशमुख म्हणाल्या की, बालकांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वांसाठी, सर्वच आजारांवर या फाउंडेशनच्या माध्यमातून सवलतीच्या दरात उपचार सेवा प्रदान करण्यात येणार आहे. माझी माऊली मातृत्व सहयोग योजनेअंतर्गत महिलांची विशेष काळजी त्या निमित्ताने घेतल्या जाणार आहे. सर्वच प्रकारच्या आजारांवर लता मंगेशकर हॉस्पिटल, हिंगणा रोड, नागपूर येथे उपचार सेवा प्रदान करून रुग्णांना आरोग्यवाहिनी (बस) द्वारे परतसुद्धा पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सवलतीच्या दरात उपचार सेवेचे ‘आमदार हेल्थ कार्ड’ लवकरच सावनेर-कळमेश्वर क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबाला वितरित करण्यात येईल.
विशेष म्हणजे,माझी माऊली फाउंडेशनच्या वतीने डॉ आयुश्री आशिष देशमुख यांनी मतदारसंघातील सरकारी शाळांचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम सुरु केले आहे. त्यांनी सावनेर-कळमेश्वर तालुक्यात कॅन्सरमुक्त अभियान राबविले, मुलींचे सर्वाइकल कॅन्सर प्रतिबंधात्मक मोफत लसीकरण केले.
लता मंगेशकर हॉस्पिटल,हिंगणा रोड,नागपूरचे उपअधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षक डॉ नितीन देवस्थळे यांनी यावेळी रुग्णालयात उपलब्ध असलेल्या सर्व सेवा-सुविधांची माहिती दिली. चांगल्या उपचार सेवेचे आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना दिले.
एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ सजल मित्रा यांच्या नेतृत्वात सर्वच वैद्यकीय विभाग चांगली उपचार सेवा देण्यास कटिबद्ध आहे.
सावनेर व्यापारी संघ आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर स्पोर्ट्स अँड एज्युकेशन सोसायटी यांच्याकडून आमदार डॉ आशिषराव देशमुख व डॉ आयुश्री देशमुख यांचे या उपक्रमाबद्दल स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी भाजपा ग्रामीण जिल्हा अध्यक्ष मनोहर कुंभारे, रामराव मोवाडे,युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष पियुष बुरडे, ॲड.अरविंद लोधी,ॲड चंद्रशेखर बैराठीया,इमेश्वर यावलकर,दिगंबर सुरतकर,मंदार मंगळे,विजय देशमूख,डॉ कृष्णराव भगत,तुषार उमाठे,विलास ठाकरे,दिपक गोरले,विनोद बागडे,मर्फी गजभिये,दिनेश मांडवकर,विनोद उलमाले,अनिल राहाटे,पिंकी मानकर,आयुषी आटोणे,माया शंभरकर,विलास महल्ले,वैष्णवी भगत,तेजस्विनी लाड,मंगेश कोठाडे यांसह अनेक मान्यवर व कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.




