गिरीश आंदे (कळमेश्वर तालुका प्रतिनिधी)
कळमेश्वर-गोंडखैरी मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल उभारण्याची नागरिकांची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्णत्वास येत आहे. या उड्डाणपुलाचे भूमिपूजन शुक्रवार, २४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार असून, कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या उड्डाणपुलासाठी ५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कळमेश्वरवासीयांची ही दीर्घकाळ प्रलंबित मागणी पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश सदस्य डॉ. राजीव पोतदार यांच्यासह स्थानिक जनप्रतिनिधींनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
कळमेश्वर-गोंडखैरी मार्गावरील रेल्वे क्रॉसिंग हे औद्योगिक क्षेत्राजवळ असल्याने दिवसभर रेल्वे फाटक वारंवार बंद राहते. त्यामुळे औद्योगिक वसाहतीतील कामगार, अधिकारी, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. सावंगी, सेलू, लिंगा, उपरवाही, कळंबी, आष्टी, केतापार, लोणारा आदी गावांतील नागरिक दररोज या मार्गाने कळमेश्वरला ये-जा करतात. तहसील कार्यालय, बँका, न्यायालय, दवाखाने आणि बाजारपेठ यांमुळे या मार्गावर वाहतुकीचा मोठा ताण असतो.
दिल्लीकडे जाणाऱ्या अनेक गाड्या या मार्गावरून जात असल्यामुळे दिवसभरात गेट अनेक वेळा बंद होत असते. परिणामी वाहतूक कोंडी व वेळेचा अपव्यय होत होता. आता या उड्डाणपुलामुळे या भागातील वाहतूक सुरळीत होणार असून नागरिक, विद्यार्थी, शेतकरी आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या उड्डाणपुलामुळे कळमेश्वर परिसरातील विकासाला नवे बळ मिळेल, असा विश्वास नागरिक आणि स्थानिक नेत्यांनी व्यक्त केला आहे.
Home Breaking News नितीन गडकरी यांच्या हस्ते कळमेश्वर-गोंडखैरी रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपूलाचे भूमिपूजन उद्या




