गिरीश आंदे
सावनेर–तिष्टी मार्गे काटोल रोडवर महावितरणकडून नवीन वीजवाहिनी उभारणीसाठी करण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीनंतर नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कापलेल्या झाडांच्या फांद्या रस्त्याच्या दुतर्फा तसेच काही ठिकाणी थेट रस्त्यावरच टाकून दिल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
विशेषतः थंडीच्या दिवसांत पहाटे व रात्री धुके पडत असताना दुचाकी व चारचाकी वाहनांचा तोल जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. हा मार्ग शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार आणि अवजड वाहनांसाठी महत्त्वाचा असतानाही वनविभागाकडून कोणतीही दक्षता घेतली जात नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
वृक्षतोडीस परवानगी देताना पर्यावरणीय नियमांचे पालन, कापलेल्या झाडांची योग्य विल्हेवाट आणि सार्वजनिक सुरक्षिततेची जबाबदारी वनविभागावर असते. मात्र, प्रत्यक्ष परिस्थितीत रस्त्यावर फांद्यांचा सडा पडलेला असतानाही कळमेश्वर वनपरिक्षेत्र अधिकारी व संबंधित वनविभागाने ना पाहणी केली, ना कोणतीही कारवाई केल्याचे चित्र आहे.
“अपघात घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, एखादी जीवघेणी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. महावितरणचे काम सुरू असले तरी त्यावर नियंत्रण ठेवणे व नियमांचे पालन करून घेणे हे वनविभागाचे कर्तव्य असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, वनविभाग व संबंधित प्रशासनाने तातडीने रस्त्यावरील सर्व फांद्या हटवून वाहतूक सुरक्षित करावी, तसेच या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.




